कर्जत – कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड आज पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे काकासाहेब तापकीर यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी अभय पाटील यांनी विजय मिळवला आहे. दोन्ही गटाचे समान संख्याबळ असून देखील या निवडीत भाजपने बाजी मारत राष्ट्रवादीचे सदस्य फोडल्याने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला.
सभापती पदासाठीसाठी भाजपकडून काकासाहेब तापकीर यांनी तर गुलाबराव तनपुरे यांनी अर्ज भरले होते. मतदान प्रक्रिया सुरू झाली शेवटी काकासाहेब तापकीर यांना 9 मते पडली तर गुलाब तनपुरे यांना 8 मते पडली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 1 मत बाद झाले. त्यामुळे तापकीर हे एक मताने विजयी झाले. उपसभापती पदासाठी भाजपचे अभय पाटील यांना 10 तर श्रीहर्ष शेवाळे यांना 8मते पडली. यामध्ये अभय पाटील हे दोन मताने विजयी झाले.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित पवार आणि राम शिंदे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी 9 जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित 9 जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले. या अटीतटीच्या लढतीमुळे सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज ही निवड प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये भाजप आमदार राम शिंदे गटाने बाजी मारली आहे. या निकालाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.