कर्जत : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंब जवळील पोशिर नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेली महिला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी (दि. 13) सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक केतन सांगळे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना घेऊन पोशिर नदी परिसरात शोध मोहीम सुरू करून परिसर पिंजून काढला मात्र सायंकाळपर्यंत त्या महिलेचा शोध लागला नाही, अंधारामुळे शोधकार्य थांबले.
कळंब गावातील करुणा सचिन बदे (वय 22) ही महिला गुरुवारी सकाळी 10 वाजता गावाबाहेरील पोशीर नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दोन दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पोशीर नदीचे पात्र पावसाच्या पाण्याने भरून वाहत होते. करुणा या कळंब ग्रामपंचायतीने बांधलेल्या गणेश विसर्जन घाटावर नेहमीप्रमाणे कपडे धुवत असताना आजच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने करुणा यांचा तोल जाऊन नदीत कोसळल्याने त्यांचा पाण्यात वाहून गेल्या आहेत.
ही माहिती मिळताच कळंब गावातील अनेक ग्रामस्थ पोशीर नदीवर असलेल्या पुलावर पोहचले होते. तर पोही, पोशिर, चिकनपाडा, माले या गावातील तरुण नदीच्या कडेला करुणा बदे यांना शोधत होते. तर काही ग्रामस्थ आणि बदे कुटुंबातील लोक हे उल्हासनदी वरील पाषाणे पूल येथे पोहचले आहेत. पोशिर नदी पुढे खाड्याचापाडा येथे कर्जतहून वाहत येणाऱ्या उल्हास नदीला जाऊन मिळते.
पाषाण येथील उल्हास नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि पोलीस शोधकार्यास मदत करीत आहेत. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे, पोलीस हवालदार गर्जे, होमगार्ड मनीष खुणे, अरुण पाटील यांच्यासह स्थानिक रहिवासी दिनेश भोईर, प्रशांत बदे, नरेश राणे, सुधाकर म्हसे तसेच काही तरुणांनी उल्हासनदी आणि पोशिर नदीचा परिसर शोध घेतला; मात्र सायंकाळपर्यंत तरी नदीत वाहून गेलेल्या करुणा सचिन बदे यांचा शोध लागला नाही.