Crime News : कारेगावात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये कामगाराची गोळी झाडून हत्या; अज्ञात आरोपीचा शोध सुरू
Crime News : कारेगावच्या साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये हामजा शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके कार्यरत आहेत.

Crime News : रांजणगाव गणपती, दि. २९ : कारेगाव येथील साईनगर परिसरात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख (वय ३९) यांची अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हामजा शेख हे विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करीत होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास ते कामावर गेले. त्यानंतर सुमारे पावणेसात वाजता शेजारील महिलेने त्यांच्या पत्नीला हामजा प्लॅन्टमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती दिली. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून शिरूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
शिरूर ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक तपासणीत त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम आणि आरपार छिद्र असल्याचे आढळले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पाण्याच्या प्लॅन्टमध्ये गोळीची रिकामी पुंगळी आढळून आली. तसेच, घटनेच्या काही वेळापूर्वी परिसरात फटाका फुटल्यासारखा मोठा आवाज ऐकू आल्याचे एका महिलेने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी हामजा शेख यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके यांनी केली असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे करीत आहेत.
हत्येचे कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याची चार पथके तयार करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.





