देशभर राबवणार शिक्षणाचा कर्डेलवाडी पॅटर्न!

पुण्यातील कर्डेलवाडी शाळेचा “एनसीईआरटी’ करणार अभ्यास
डॉ. राजू गुरव
पुणे- शिक्षण क्षेत्रात मापदंड घालून देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा कर्डेलवाडीचा अभ्यास तब्बल महिनाभर आता एनसीईआरटीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षणातील हा “कर्डेलवाडी पॅटर्न’ आता देशभरात राबवला जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीईआरटी) जिल्ह्यातील शिरूर येथे वर्षातील 365 दिवस सुरू असलेल्या कर्डेलवाडी प्राथमिक शाळेचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. तो पूर्ण झाल्यानंतर हा पॅटर्न देशभर राबविण्यासाठी चाचपणी करण्यात येणार आहे.
शैक्षणिक कॅलेंडरनुसार शाळांना वर्षभरात 76 दिवस विविध कारणांनी सुट्ट्या असतात. त्यामुळे वर्षभर हा शैक्षणिक यज्ञ कोठेच चालत नाही. मात्र याला कर्डेलवाडी शाळा आता अपवाद आहे. वर्षभर एकही सुट्टी न घेता शाळा सुरू असते. या अभिनव आणि गुणवत्तापूर्ण कार्याची दस्तूरखुद्द “एनसीईआरटी’ च्या सर्वेक्षण विभागाने दखल घेतली. या विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. विशाल पंजानकर यांच्या नेतृत्वाखाली एक संशोधन पथक कर्डेलवाडी शाळेचा सविस्तर अभ्यास करणार आहे.
हे पथक महिनाभर शाळेचे अध्ययन करणार असून विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिकांशी संवाद साधून माहिती जमा करणार आहे. शाळेतील अध्ययन-अध्यापन पद्धती, शिक्षकांचे नियोजन व त्याची अंमलबजावणी, राबवित असलेले उपक्रम आदींचा यावेळी अभ्यास करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
“एनसीईआरटी’ च्या सर्वेक्षण विभागाने कर्डेलवाडी शाळेचा अभ्यास करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे परवानगी मागितली आहे. त्यानुसार त्यांना परवानगीही देण्यात आलेली आहे. पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळेत एकूण 70 विद्यार्थी आहेत.
छोट्या व मोठ्या गटात 30 विद्यार्थी आहेत. शाळेत एकूण तीन शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व त्यांच्या पत्नी बेबीनंदा सकट तसेच कैलास धसगुडे आदींचा त्यात समावेश आहे. कर्मचारी मात्र एकही नाही.
शैक्षणिक गुणवत्ता राखताना विद्यार्थ्यांची क्षमता पाहून त्यांना अध्ययनासाठी मदत करतो. विद्यार्थ्यांचे मनोर्धेर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. पहिलीच्या विद्यार्थ्याने पुढील वर्गातील पुस्तकांचे वाचन आणि गणिते सोडवावीत, अशी तयारी करून घेण्यात येते. मुलांसाठी सुट्टीच्या दिवशी विविध स्पर्धा घेण्यात येतात. मनोजंनात्मक खेळाबरोबरच फिल्मही दाखविण्यात येतात. विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरच शिक्षण देण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतो.
-दत्तात्रय सकट, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, कर्डेलवाडी





