Karan Johar: करण जोहरचा धक्कादायक खुलासा – “चित्रपटसृष्टीतली मैत्री फक्त दिखावा आहे, खरं नातं फक्त शाहरुखशीच”

Karan Johar: चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहर यांनी अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीतील मैत्री आणि नातेसंबंधांबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, इंडस्ट्रीमध्ये बहुतेक कलाकारांची मैत्री फक्त पार्ट्यांपुरतीच मर्यादित असते, काम आणि पैशांच्या बाबतीत सर्वजण स्वतःचा फायदा पाहतात. मात्र, या सगळ्या परिस्थितीत त्यांनी एकाच व्यक्तीला अपवाद ठरवले ते म्हणजे शाहरुख खान.
“इंडस्ट्रीतील नाती फक्त दिखावा आहेत”
करण जोहर यांनी ट्रेड विश्लेषक कोमल नाहटा यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले,
“चित्रपटसृष्टीत मैत्रीचा अर्थ फक्त पार्टींपर्यंतच आहे. काम आणि पैशांच्या बाबतीत कोणीही कुणासाठी तडजोड करत नाही. कोणताही अभिनेता असं म्हणत नाही की ‘माझ्या मागच्या दोन चित्रपटांनी नुकसान झालं, म्हणून मी निर्माता म्हणून तुझे पैसे परत देतो.’ सर्व जण फक्त स्वतःचा फायदा पाहतात.”
त्यांनी पुढे म्हटलं,
“अभिनेते पार्ट्यांमध्ये अतिशय छान आणि प्रेमळ असतात, पण ते काम करताना केवळ व्यावसायिक हेतूनेच वागतात. माझ्यासाठीही ही इंडस्ट्री व्यवसायासाठी आहे, दानधर्मासाठी नाही.”
“नुकसान कोणीच सहन करत नाही”
करण जोहर यांनी स्पष्ट केलं की इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी अगदी ज्यांना त्यांनी स्वतः लाँच केलं त्या लोकांनीही कधीच नुकसानाची जबाबदारी घेतली नाही. “प्रत्येकजण आपली फी घेऊन काम करतो. पण जर चित्रपट अपयशी ठरला, तर कुणीही तोटा वाटून घेण्यास तयार नसतो,” असे करण म्हणाले.
शाहरुख खान – एकमेव अपवाद
करण जोहर यांनी शाहरुख खानसोबतच्या नात्याबद्दल विशेष उल्लेख केला. ते म्हणाले,
“शाहरुख खान हे या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेव अपवाद आहेत. मी त्यांना मित्र, सहकारी, भाऊ आणि माणूस म्हणून खूप मानतो. त्यांनी कधीही माझ्याशी किंवा माझ्या वडिलांशी पैशांबाबत चर्चा केली नाही. ते नेहमी म्हणायचे, ‘कागद पाठव, मी साइन करतो.’”
करण पुढे म्हणाले,
“मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून शाहरुखशी बोलतो, तेव्हा ते स्क्रिप्टसुद्धा विचारत नाहीत. मला फक्त सांगायचं असतं की मी एक चित्रपट करत आहे आणि मला या तारखा हव्या आहेत. आमच्यात कधीच पैशाचा विषय आला नाही. त्यांच्या व्यतिरिक्त प्रत्येक कलाकारासोबत माझं नातं पूर्णतः व्यावसायिक आहे, आणि मला त्यात काहीच अडचण नाही.”
नेपोटिझमवरही दिलं उत्तर
करण जोहर यांच्यावर नेहमी नेपोटिझम म्हणजेच घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र त्यांनी सांगितले की, “मी कोणत्याही गटाचा भाग नाही, आणि कोणाचं करिअर मोडणं किंवा बनवणं माझा उद्देश नाही. मी काम करतो कारण मला चित्रपट बनवणं आवडतं.”





