कराडला पाच ठिकाणी होणार कारंजे

रेव्हिन्यू क्‍लबसमोरील कारंजाचे नगराध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

कराड – स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचे औचित्य साधून कराड शहरातील चौक सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत शहर स्वच्छ करण्याबरोबरच सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी नगरपालिकेने पावले टाकली आहेत. या अंतर्गत शहरात पाच ठिकाणी आकर्षक कारंजे उभारण्यात येणार आहेत. यातील रेव्हिन्यू क्‍लब, नूतन प्रशासकीय इमारती समोरच्या चौकात नगरपालिकेने उभारलेल्या कारंजाचे लोकार्पण नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कराड नगरपालिकेने 2020 मध्येही प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शहर स्वच्छ करण्याबरोबरच सुंदर व सुशोभित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले. या अंतर्गत शहरात रेव्हिन्यू क्‍लब समोरचा चौक, कोल्हापूर नाका, कृष्णा नाका, प्रीतिसंगम उद्यान, बारा डबरे येथील कचरा डेपो या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईनचे व रंगीबेरंगी पाण्याची उधळण करणारे आकर्षक कारंजे उभारण्यात येणार आहेत.

यातील रेव्हिन्यू क्‍लबसमोरच्या चौकात सुमारे 2 लाख रूपये खर्चून पाच नोझलचा कारंजा बांधण्यात आला आहे. उर्वरित कारंजे येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहेत, असे डांगे यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजयसिंह यादव, अर्चना ढेकळे, हणमंत पवार, विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, स्मिता हुलवान, सौरभ पाटील, बाळासाहेब यादव, सुहास जगताप, किरण पाटील, प्रियांका यादव, वैभव हिंगमिरे, विद्या पावसकर, जयंत बेडेकर, उमेश शिंदे, निशांत ढेकळे, अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, रफीक भालदार, ए. आर. पवार, मिलिंद शिंदे, धन्वंतरी साळुंखे, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

धुळीचे प्रदूषण कमी होणार
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील धुळीचे प्रमाण, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार नगरपालिका उपाययोजना करत आहे. श्रमदान करून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात पाच ठिकाणी होणारे कारंजे धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत, असा विश्वास मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.

बंद कारंजा पुन्हा सुरू करावा
पंचायत समितीच्या शेजारी नगरपालिकेच्या वतीने कारंजा सुरू करण्यात आला आहे. शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. कृष्णा घाटावर स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधी परिसरात कराड पालिकेने अतिशय मनमोहक रंगीत कारंजा सुरू केला होता. परंतु राजकीय मतभेदांमुळे हा कारंजा काही दिवसातच बंद करण्यात आला. हा बंद असलेला कारंजा पालिकेने पुन्हा सुरू करून या परिसराचे सौंदर्य वाढवावे तसेच उभारलेले कारंजे कायमस्वरुपी सुरू रहावेत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)