हिटरलशाही पध्दतीने कारभार करणारा कराडचा मुख्याधिकारी
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व पावसकरांचा घणाघात ; विशेष सभेत डांगेंची खरडपट्टी
कराड – कराड शहरातील रस्त्यांना तसेच वाहतुकीला अडसर ठरणारी अतिक्रमणे काढण्याची परवानगी पालिका सभागृहाने दिली होती. मात्र, अनेक नागरिकांच्या खासगी जागेतील शेड, व्यापार्यांच्या दुकानांचे बोर्ड, पायर्या काढण्यात आल्या आहेत. हे करण्यासाठी पालिका अधिकार्यांना कोणी सुपारी दिली होती का? मुख्याधिकारी मोकाट सुटलाय काय? नगराध्यक्षांनी बोलवलेल्या विशेष सभेला पालिका अधिकार्यांना हजर न राहण्याचे लेखी पत्र मुख्याधिकारी काढतोच कसा? ही तर हुकमशाही झाली.
हा हिटलरशाही पध्दतीचा मुख्याधिकारी डांगे यांचा कारभार चालणार नाही, असा इशारा उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे होत्या. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या सभेचे कामकाज चालले.दरम्यान, अतिक्रमण काढण्याचे आदेश मुख्याधिकारी डांगे यांनीच दिल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तर मुख्याधिकाऱ्यांनी कराड शहराची माफी मागावी, असे आवाहन नगराध्यक्षा शिंदे यांनी केले.
कराड शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम व हॉकर्सबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सभेत मुख्याधिकारी यशवंत डांगे सदस्यांच्या रडारवर होते. विशेष सभा होणार की नाही, याविषयी संभ्रम होता. मुख्याधिकारी यांनी विशेष सभेला हजर न राहण्याचे लेखी पत्र काढल्यानंतर सभेची उत्सुकता आणखी ताणली गेली होती. मात्र, नगराध्यक्षा शिंदे व काही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. या भेटीनंतर सभा घेण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.त्या आदेशानुसार सायंकाळी सभेला सुरूवात झाली. मात्र मुख्याधिकारी डांगे सभेला गैरहजर राहिले .
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक विनायक पावसकर, फारूख पटवेगार यांनी कराड शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मुख्याधिकाररी डांगे यांनी शहरातील व्यापारी, नागरिकांचे मोठे नुकसान केल्याचा आरोप केला. त्यांच्याया कृतीचा निषेध केला. यावेळी विनायक पावसकर म्हणाले, नगराध्यक्षांना विशेष सभा घेण्याचे अधिकार नाहीत. मी सभा रद्द करून दाखवतो, असे आवाहन मुख्याधिकारी डांगे यांनी दिले. हा काय प्रकार आहे? शहरातील कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रसंग निर्माण झाल्यास तात्काळ विशेष सभा घेण्याचा नगराध्यक्षांचा अधिकार आहे का? या प्रश्नावर उपस्थित
अधिकार्यांनी मौन पाळले. मोहिमेला विरोध करणार्या सदस्यांना सदस्यत्व
रद्द केले जाण्याचा भिती घालण्यात आली.
विशेष सभेसंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी सभा घेतल्यानंतर मानधन द्यावे लागते, असे तकलादू उत्तर मुखाधिकारी यांनी दिले. नगराध्यक्षांना अपात्र करण्याची नोटीस देण्याचा कोणताही अधिकार मुख्याधिकाऱ्यांना नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट करत डांगेंना चांगलेच फैलावर घेतल्याचे पावसकर यांनी सांगितले.
जयवंत पाटील म्हणाले, कराड शहरातील वाहतुकीस अडसर ठरणारी अतिक्रमणे काढण्याची परवानगी सभागृहाने दिली आहे. मात्र, नागरिकांच्या खाजगी
जागेतील शेड, पायर्या, दुकानांचे बोर्ड यांची मोडतोड करून काढण्यात आले आहेत. यासाठी मुख्याधिकारी व पालिका अधिकार्यांना कोणी सुपारी दिली होती का? या कारवाईबाबत विचारणा ज्यावेळी केली. त्यावेळी मुख्याधिकारी यांचा दबाब असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या नावाखाली मनमानी कारभार सुरू आहे. चांगल्या कामाला आम्ही पाठिंबाच दिला.
मात्र मनमानी सहन करणार नाही. गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बारा डबरी येथील घरकुल परिसरात ड्रेनेज लाईन फुटली आहे. मैला रस्त्यावर आला आहे. याकडे पालिकेला पहायला वेळ नाही. पालिका बजेट नसल्याचे कारण सांगितले जात आहे. आणि मुख्याधिकारी मात्र स्वच्छ सर्व्हेक्षणाची टिमकी वाजवत आहे. यावेळी विजय वाटेगावकर, फारूख पटवेगार, राजेंद्रसिंह यादव, सौरभ पाटील, कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी मुख्याधिकारी डांगे यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला.
मुख्याधिकार्यांना सल्ला देणार्या “त्या” कोण?
स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या नावाखाली कराड शहराचे विदृपीकरण करण्यात आले आहे. 2001 साली सुध्दा अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी
सर्वांना विश्वासात घेऊन मोहीम राबवण्यात आली. मात्र सध्याचे मुख्याधिकारी कोणाच्यातरी सल्ल्याने चालत आहेत. त्यामध्ये कोणी जेन्डस् तर नाही, मात्र कोणी तर लेडीज असल्याचे पावसकर यांनी सांगितले. यावेळी कोण आहेत त्या ? संबंधित लेडीज सभागृहाच्या सदस्या आहेत का? अशी विचारणा सदस्यांनी केली. यावेळी त्या सदस्या आहेत की कोण आहेत यावर मी काही बोलणार नाही, असे पावसकर यांनी स्पष्ट करताच एकच हाशा पिकला.
असा पायंडा नको…
गेली 30 महिन्यात लोकशाही आघाडीने स्वाभिमान सोडला नाही. मुख्याधिकारी यांच्याकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. म्हणून आम्ही
त्यांच्या दालनाकडे फिरकलोही नाही. मात्र, जाताजाता डाव विस्कटून टाकायचा अशीच त्यांची कार्यपध्दती आहे. त्यामुळे कोणीही यायचे आणि पालिका चालवायची हा पायंडा नको. यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सौरभ पाटील
यांनी सांगितले.





