कराडमध्ये चित्तथरारक कसरतींचा रंगला थरार…

मॉडेलिंग, पॅरामोटर्स, मल्लखांब प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
कराड – संपन्न मराठी संस्कृतीचे प्रदर्शन, पोलीस तसेच लष्करी शिस्तीचे दर्शन, एरो मॉडेलिंगच्या कसरती, पॅंरामोटर्सचा हवाई थरार अन् मल्लखांबावरील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सोमवारी कराडच्या शिवाजी स्टेडियमवर बावीसावा विजय दिवस समारोह साजरा करण्यात आला.

भारतीय सैन्यदलाच्या बांगलामुक्ती संग्रामातील विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ विजय दिवस समारोह समितीच्यावतीने येथे दरवर्षी विजय दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सोहळ्याला भर दुपारी देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात सुरुवात झाली. यंदाच्या बाविसाव्या विजय दिवसाच्या ब्रॅंण्ड अँम्बेसिडर सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी ओपन जीपमधून संचलनाचे नेतृत्व केले.
मीनल ढापरे यांनी महिलांच्या मोटरसायकल रॅलीचे नेतृत्व केले. तिरंगा हातात घेऊन साडी आणि फेटा परिधान केलेल्या मराठमोळ्या वेशभूषेतील शंभरावर महिलांचीही मोटरसायकल रॅली लक्षवेधक ठरली. खेळाडूंनी आणलेल्या विजयी ज्योतिला पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. बावीसाव्या विजय दिवस सोहळ्याला खा. श्नीनिवास पाटील, कोल्हापूरचे छ. शाहू महाराज, कर्नल संभाजी यादव, जय मुनियाल, मेजर के. पी. नदाप्पा, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी, कर्नल संभाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
संचलनात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुली, मुले, सैन्यदल व पोलिसांची पथके, बॅंण्डपथके सहभागी झाली होती. अधिक्षक तेजस्वी सातपुते, मृणाल कुलकर्णी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. प्रारंभी बॉंम्बे इंजिनिअरिंग सेंटर पुणे यांच्या पथकाने बॅंण्ड डिस्प्ले सादर केला. मी अँण्ड सी आणि डी टू डी या ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या समुहनृत्यास उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.
आकाशात गिरक्या घेत झेपावणारी आणि क्षणात खाली उतरणाऱ्या रिमोटवरील विमानांच्या कसरती, अँरो मॉंडेलिंग शो मध्ये कराडकरांना पहायला मिळाल्या. छोट्या विमानांच्या या हवाई कसरतींनी उपस्थित बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन झाले. निर्भया पथकाच्यावतीने युवतींना स्व-संरक्षणाची प्रेरणा मिळावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. निर्भया पथकाकडून या कार्यक्रमात ज्युदो कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
शेकडो फूट उंचीवरुन स्टेडियमवर उतरलेल्या दोन पॅरामोटर्स धारकांनी आपल्या अप्रतिम कौशल्याने सर्वांची मने जिंकली. या पॅरामोटर्सधारकांना कॅप्टन एरीक मेंडीस यांनी प्रशिक्षीत केले होते. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी मल्लखांबाचे 12 प्रकार सादर केले.उंब्रजचे बाईकस्टंटबाज बबन कुंभार यांनी हिरो होंडा मोटरसायकलवरून चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली.
यावेळी आर्मीच्या बॅंण्ड पथकाने सादर केलेल्या गाण्यांनीही स्टेडियमवर एक अनोखी वातावरण निर्मिती केली गेली. या सोहळ्यासाठी शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे दुपारी दोन वाजल्यानंतर शिवाजी स्टेडियमवर विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती. भरत कदम यांनी सोहळ्याचे समालोचन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.












