कराड – करोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दि. 22 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला. तेंव्हापासून आजअखेर कराड तालुक्यात करोना बाधितांचा आकडा तब्बल 534 वर पोहोचला आहे. तर कराड शहरातील 26 नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. करोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत सातारा जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण संख्येत कराड तालुका अव्वल स्थानावर आहे. ही बाब नक्कीच भूषणावह नाही. संपूर्ण जगाला मृत्यूच्या खाईत ओढणाऱ्या करोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने दि. 22 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन जाहीर केला. संपूर्ण देशात शुकशुकाट पसरला. लॉकडाऊनमुळे करोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले. मात्र, तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर त्यात आलेली शिथिलता आणि लोकांचा बेजबाबदारपणा चांगलाच महागात पडल्याचे दिसून आले. लॉकडाऊन शिथील केला मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन, मास्कचा वापर, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आदींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीशर्ती घालण्यात आल्या. मात्र, या नियमांचे उल्लंघन करोनाला निमंत्रण देणारे असेच ठरले आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा 11 लाखांच्या घरात पोहोचला. तसेच प्रशासनाचे प्रयत्न व डॉक्टरांच्या योगदानाच्या जोरावर करोना मुक्तीचाही आलेख चढता राहिला आहे. जवळपास 6 लाखांवर लोक करोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत करोना बाधितात अव्वल स्थानावर आहे. तसेच सातारा जिल्ह्यात कराड तालुक्याने पहिल्यापासूनच करोना बाधितांच्या आकडेवारीतील पहिले स्थान सोडलेले नाही. सध्या तालुक्यात 534 जण बाधित आहेत. वनवासमाची, मलकापूर-आगाशिवनगर, तारूख, तुळसण, म्हासोली, उंब्रज, वराडे आणि त्यानंतर कराड शहर करोना बाधितांचे हॉटस्पॉट ठरत आहे. या ठिकाणाहून करोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाल्याचे दिसून आले. मंगळवार पेठेतील पालकरवाडा येथे पहिला करोनाचा रूग्ण आढळून आला. त्यानंतर रूक्मिणीविहार, बनपूरकर कॉलनी, बैलबाजार रोड, त्रिमुर्ती कॉलनी, पांढरीचा मारूती परिसरातील समर्थ अपार्टमेंटमध्ये बाधित रूग्ण आढळून आल्याने हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.