यशवंतनगर : शहापूर (ता. कराड) येथे बिबट्यांच्या हल्ल्याची मालिका सुरूच असून शनिवारी सायंकाळी एका युवकावर तर रविवारी दोघांवर बिबट्याने हल्ला चढवला. यात तिन्ही युवक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे ग्रामस्थ पुरते हादरले आहेत. शहापूर येथील अंतवडी रस्त्यावर असलेल्या ‘पन्नाशी’ नावच्या शिवारात शनिवारी सायंकाळी निखिल मारुती वांगडे हा युवक पाण्यावर दारे बदलण्यासाठी गेलेला असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. निखिलने धैर्याने हातातील खोर्याने प्रतिकार करत आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. या हल्ल्यात निखिल जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी उपचारार्थ रुग्णालयात हलवले. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण असतानाच रविवारी सकाळी साडेअकरा वाजता गावातील जयवंत फसाले यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने जयवंत यांच्या डोक्यावर पंजा मारल्याने ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कराड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुपारी गावानजीक पाण्याच्या टाकीजवळ सौरभ कदम या युवकावरही बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये सौरभ जखमी झाला असून उपचारार्थ त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनांमुळे शहापूरसह परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभागाने परिसरात गस्त वाढवली आहे. ग्रामस्थांनी शेतात जाताना काळजी घ्यावी, रात्री एकटे फिरणे टाळणे, तसेच सावध राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. मादी बिबट्यासह बछड्यांचा वावर शहापूर, वडोली निळेश्वर, शिरवडे, रिसवड या भागांत गेल्या एक महिन्यापासून मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले यांचा वावर असल्याचे स्थानिक सांगत आहेत. गेल्या आठवड्यात रिसवड येथे बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला होता. या घटनांबाबत आमदार मनोज घोरपडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.