Karad: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा गोंधळ झाला आहे. या निवडणुकीचा पुरता पोरखेळ करून लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. येथील निवासस्थानी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजितराव पाटील- चिखलीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यात घटना दुरुस्ती धाब्यावर बसवून दहा वर्षे निवडणुका रखडवल्या. आता सरकारने 20 नगरपालिकांच्या निवडणुका थेट आदल्या दिवशी पुढे ढकलून अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. तयारी नसताना निवडणुका घाईगडबडीने का घेतल्या? निवडणूक आयोग ही सर्वोच्च संस्था आहे. ती निःपक्षपाती असायला हवी. मात्र, आज ती पूर्णपणे मोदी सरकारची झाली आहे. राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचे पुरावे दिल्यानंतरही आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हे सरकार घटनात्मक पदांवर बसलेल्यांना मॅनेज करत आहे. महाराष्ट्रात इतके भ्रष्ट सरकार यापूर्वी कधी आले नव्हते. मोठे उद्योग राज्यात येण्यास तयार नाहीत. डिसेंबर- जानेवारीत उत्तीर्ण होणार्या मुलांना नोकर्या मिळणार नाहीत. ‘एआय’मुळे गंभीर बेरोजगारी उभी राहील. लाखो मुलं बेकार होतील. महाराष्ट्रात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, सरकारचे लक्ष केवळ कॉन्ट्रॅक्ट देणे आणि कमिशन घेणे, यावरच आहे.’’