Kapil Sibal on Amit Shah। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्याबद्दल कोणतीही ठोस माहिती समोर येत नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी काँग्रेससह अनेक पक्ष आता केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. अशा परिस्थितीत आता राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट लक्ष्य केले. “धनखड साहेब रुग्णालयात आहेत की योगा करत आहेत” असे म्हणत शाह यांना खोचक सवाल केला आहे. सिब्बल यांनी खोचकपणे आपल्या पोस्टमध्ये, “धनखड बेपत्ता… अमित शाह जी, मला माहित आहे की तुम्ही खोटेपणापासून दूर राहा. किमान आम्हाला सांगा की धनखड जी रुग्णालयात आहेत, योगा करत आहेत की टेबल टेनिस खेळत आहेत?”असा सवाल केला आहे. अमित शाह यांनी एक दिवस आधी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी धनखड यांच्याविषयी बोलताना,”माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. कोणालाही त्यात काहीही शोधण्याची गरज नाही. शाह यांनी असेही म्हटले की, धनखड यांनी संवैधानिक पदावर असताना चांगले काम केले.” असे म्हटले होते. धनखड योगा आणि टेबल टेनिसमध्ये व्यस्त उपराष्ट्रपती पदावरून अचानक राजीनामा दिल्यानंतर धनखड त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत आणि नियमितपणे योगा करत असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच ते टेबल टेनिस खेळायला विसरलेले नाहीत. धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल असल्यापासून टेबल टेनिसची आवड होती. त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की ते दररोज योगा करतात आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसह आणि जवळच्या लोकांसोबत टेबल टेनिस खेळतात. अचानक राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीची तयारी धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. आता त्यांच्या उत्तराधिकारी निवडीची तयारी जोरात सुरू आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याच वेळी, विरोधी आघाडी ‘इंडिया’ने त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उभे केले आहे. ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.