Kapil Sharma: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याच्याशी जवळीक ठेवणाऱ्यांवर जीवघेण्या हल्ल्यांचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर ददोनदा गोळीबाराच्या घटना घडल्या. या घटनांमुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे. कपिल शर्माचा कॅप्स कॅफे 4 जुलै 2025 रोजी सुरू झाला. केवळ सहा दिवसांनी, म्हणजेच 10 जुलैला कॅफेवर पहिला गोळीबार झाला. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा सुमारे 25 राऊंड फायर करण्यात आले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ उडवली आहे. त्यात कथित शूटरने धमकी दिली आहे की, “जो कोणी सलमान खानसोबत काम करेल, तो आमच्या निशाण्यावर असेल.” विशेष म्हणजे, कपिल शर्माच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच सलमान खान हजेरी लावून गेला होता. त्यामुळे या गोळीबारांचा आणि सलमानशी असलेल्या मैत्रीचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही सलमान खानच्या जवळच्या व्यक्तींवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्धीकींवर भररस्त्यात गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळीही सलमानशी असलेली त्यांची मैत्री हेच कारण मानले गेले होते. या पार्श्वभूमीवर, बिश्नोई गँगचा राग अद्याप ओसरलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या जवळ असणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.