Kangana Ranaut – भाजप खासदार व अभिनेत्री कंगना राणावत मानहानीच्या खटल्यातील अडचणीत वाढ होत आहे. रिट्विट मानहानी प्रकरणामध्ये गेल्या सुनावणीमध्ये त्यांनी वृद्ध शेतकरी मोहिंदर कौर यांची माफी मागितली होती. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध आरोपांची निश्चिती केल्याने, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 4 डिसेंबर तारिख निश्चित केली आहे. सोमवारच्या सुनावणीसाठी मोहिंदर कौर यांचे पती लाभ लिंग यांनी हजेरी लावताना, कोणत्याही शेतकरी संघटनेचा दबाव नसल्याचे सांगत ही लढाई स्वत: करत असल्याचे न्यायालयात सांगितले. डिसेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने 3 कृषी कायदे आणले होते. यांच्याविरुद्ध पंजाब व हरियाणातील शेतकर्यांनी निदर्शने केली होती. यावेळी कंगना राणावतने बठिंडा जिल्ह्यातील बहादुरगड जांडियन गावातील वृद्ध शेतकरी मोहिंदर कौर यांची तुलना शाहीन बाग आंदोलनातील बिल्किस बानोशी केली. या शिवाय कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये अशा महिला चळवळींमध्ये सामील होण्यासाठी १०० रुपये दिले जात असल्याचा दावा, देखील केला होता. कंगनाने केलेल्या पोस्टला अपमानास्पद म्हणताना मोहिंदर कौर यांनी जानेवारी 2021 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सध्या सुरु आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये, कंगना यांनी सदर पोस्ट ही गैरसमजातून झाल्याचे आणि कुणालाही दुखावण्याचा हेतू नसल्याचे सांगितले होते. यावेळी मोहिंदर कौर यांचे पती लाभ सिंग व त्यांचे वकिल रघबीर सिंग बेनीवाल यांच्याद्वारे, कंगना यांनी सर्वोच्च न्यायालयासह सर्व कायदेशीर उपायांचा वापर केला होता, मात्र सर्वच स्तरावरुन त्यांना निराशा हाती लागल्याने त्या माफी मागत आहेत, असा दावा करण्यात आला होता.