चर्चा जोरदार, पण बॉक्स ऑफिसवर निराशा; कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

Emergency Movie Box Office Collection: अभिनेत्री कंगना रणौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इमर्जन्सी’ नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर 17 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लावलेल्या आणीबाणीच्या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. पॉलिटिकल ड्रामा असल्याने या चित्रपटाची रिलीज पूर्वी भरपूर चर्चा झाली. मात्र, बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे.
कंगनाचे चाहते ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र, हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकलेला नाही. या चित्रपटात कंगनाची मुख्य भूमिका असण्यासोबतच याचे दिग्दर्शन देखील तिनेच केले आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, कंगनाच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.35 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशी कमाई कमी झाली असली तरी आठवड्याच्या शेवटी यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.35 कोटी रुपयांची कमाई केली असली तरीही हा कंगनाच्या मागील 5 वर्षातील चित्रपटांच्या कमाईमधील सर्वाधिक आकडा आहे. 2023 मध्ये आलेल्या कंगनाच्या ‘तेजस’ चित्रपटाने ओपनिंग डे ला 1.25 कोटींची कमाई केली होती. तर 2022 मध्ये आलेल्या ‘धाकड’ने पहिल्या दिवशी 1.20 कोटी रुपये आणि 2021 मध्ये आलेल्या ‘थलाइवी’ने पहिल्या दिवशी 1.46 कोटी रुपयांची कमाई केली होती.
दरम्यान, इमर्जन्सी चित्रपटाचे बजेट हे 25 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. चित्रपटात कंगनासोबतच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमन या कलाकारांचीही मुख्य भूमिका आहे.





