पुणे जिल्हा | कनेरसर, पूर येथे खड्डेच खड्डे!

वाफगाव, (वार्ताहर) – खेड-पाबळ रस्त्याची फारच दुरवस्था झाली असून वर्षभरात तीन वेळा खड्डे बुजवूनही खड्डे जसेच्या तसेच आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खेड-पाबळ रस्त्यावरील वाहतूक ही खेड सेझमुळे रात्रंदिवस चालते.
मोठमोठे कंटेनर ही याच रस्त्याने जातात. रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक कंटेनर साधे साईड पट्टीवर उतरले तरी खचतात म्हणजे साइडपट्टीही मजबूत भरली गेली नाही.
यामुळे गेल्या आठवड्यात चार अपघात झाले आहेत. खड्ड्यात पाणी साठल्याने अंदाज येत नसल्याने अनेक गाड्या आपटून पाटेे तुटले आहे. रेटवडी ते पाबळ रस्त्याची खडी निघाल्याने खेड-पाबळ रोडवर खाचखळगे निर्माण झाले. उन्हाळ्यात खड्डे डांबर खडीने भरण्याचा बांधकाम विभागाने केविलवाणा प्रयत्न केला.
मात्र डांबर कमी आणि खडी जास्त आणि तीही रोलर न फिरवल्याने महिनाभरातच खडी रस्त्याला सोडून गेली. आणि दुचाकीस्वार घसरून पडले. या रस्त्याने अनेक अधिकारी पदाधिकारी जात असतात. मात्र दुर्लक्ष केले जाते. लाडकी बहिण आणि लाडका भाऊ या योजनेपेक्षा रस्त्यांचे खड्डे बुजवले तर अनेक बहिण भावांचा जीव वाचेल. अशी संतप्त भावना प्रवासी व्यक्त करत आहेत.

