प्रभात वृत्तसेवा कामशेत – कामशेत व कुसगाव या मुख्य रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून काम संथगतीने सुरू आहे. काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरात पाणी साचले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे यामुळे नागरिक मोठ्या संताप व्यक्त करत आहे. फुटलेल्या जलवाहिनीमुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे, तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून चिखल तयार झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना, रुग्णवाहिकांना व वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धूळ, चिखल आणि पाणी साचल्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही पाईपलाईन दुरुस्ती व रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने तातडीने फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करून रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.