पिंपरी | कामशेत – जांभवली रस्ता अरुंद अन् खड्डेयुक्त

नाणे मावळ, (वार्ताहर) – नाणे मावळात जाण्यासाठी कामशेत – जांभवली हा मुख्य रस्ता असून हा रस्ता अरुंद झाला असून खड्डेयुक्त रस्ता अपघातास निमंत्रण देत आहे. साइड पट्ट्यांचे काम सुरू असून त्यामुळे अधिक अरुंद झालेल्या रस्त्याने जाताना वाहनचालकांची कसरत होत आहे. या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात रोज घडत आहेत.
कामशेत – जांभवली हा नाणे मावळात जाण्यासाठी प्रमुख रस्ता आहे. परिणामी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र, साईड पट्ट्याचे काम सुरू आहे. तसेच रस्ता खड्डेयुक्त आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे अनेक वेळा अपघात घडले आहेत.
या रस्त्यावर सतत वर्दळ असते. कामगार वर्ग, विद्यार्थी, महिला या रस्त्याने ये-जा करत असतात. गेल्या काही दिवसांपासून साईटपट्ट्या वाढवणे व अरुंद रस्त्याची रुंदी वाढविण्याचे काम सुरू आहे. कामशेत स्मशान भूमी शेजारी रस्त्याच्या पश्चिम बाजूला खोदकाम केले आहे.
परंतु, रस्त्यालगत दोन फूट खोल खोदकाम केल्यामुळे कामशेत – जांभवली रस्ता अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी बॅरिकेड़्स लावण्याची गरज असून प्रशासनाने तात्काळ अपघात नियंत्रणासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहे.





