Panvel Crime News : पनवेलमधील ‘त्या’ मायलेकाच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश

पनवेल : पनवेलच्या कामोठ्यातील ड्रीम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये सापडलेल्या माय लेकरांच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन 19 वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. कामोठ्यात ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
काय घडले नेमके?
संज्योत मंगेश दोडके, शुभम महेंद्र नारायणी हे दोघेही मृत जितेंद्र जग्गी (वय ४५) याच्या परिचयाचे होते. मृत जितेंद्र याने दोघांनाही ३१ डिसेंबरला त्याच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलावले होते. तिघांनी प्रचंड दारू प्यायली. दारू प्यायल्यानंतर मृत जितेंद्र हा संज्योत आणि शुभम यांना समलैगिंक सबंध ठेवण्यासाठी आग्रह करू लागला. याचा प्रचंड राग आल्याने शुभम नारायणी याने एक्सटेंशन बोर्ड जितेंद्र जग्गी याच्या डोक्यात मारून त्याला ठार मारले. तर संज्योत याने मृत गीता जग्गी यांचा गळा आवळला. त्यानंतर आरोपी घरातील किमती सामान चोरून पळून गेले.
या प्रकरणी संज्योत मंगेश दोडके (वय १९), शुभम महेंद्र नारायणी (वय १९) यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कामोठे पोलीस आणि कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी दिली. आरोपींना उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले.





