Kamla Nehru Hospital : महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील कचरा चार दिवसांपासून उचलला गेला नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रुग्ण आणि नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा कुजल्याने लिचेटही तयार झाले होते. याची तक्रार आयुक्तांकडे पोहोचल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात कचरा उचलून परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामुळे रूग्णांना तसेच नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील रुग्णालये, क्लिनिक आणि नर्सिंग होममधून निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेची स्वतंत्र व्यवस्था आहे. वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. त्याचबरोबर रुग्णालयांतून निर्माण होणारा ओला व सुका कचरा नियमितपणे उचलणे आवश्यक असते. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. हा कचरा उचलण्यासाठी व्यवस्था असतानाही गेल्या चार दिवसांत घनकचरा विभागाची गाडीच न आल्याने कचरा साचून राहिला होता. ओला कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. रुग्णालयाने अनेकदा कचरा उचलण्यासाठी गाडी पाठविण्याची मागणी केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले जात आहे. घनकचरा विभागाची गाडी खराब झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलला गेला नव्हता. हा रूग्णालयातील दैनंदिन कचरा आहे. आता कचरा उचलण्यात आला असून, नियमित गाडी पाठविण्याबाबत घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना पत्र दिले आहे. तसेच, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही याबाबत सूचना दिल्या आहेत. – डाॅ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख