लुधियाना : पंजाबमधील सत्तारूढ आपला रामराम ठोकून महत्वाचे नेते कमलजितसिंग करवाल यांनी रविवारी कॉंग्रेसमध्ये वापसी केली. त्यामुळे ऐन पोटनिवडणुकीच्या काळात आपला राजकीय धक्का बसला आहे. लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात १९ जूनला पोटनिवडणूक होणार आहे. त्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात आप आणि कॉंग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष गुंतले आहेत. अशात आपचे राजकीय टेन्शन वाढवणारी घटना घडली. कॉंग्रेसमध्ये फेरप्रवेश करणारे करवाल हे लुधियाना जिल्ह्यातील महत्वाचे नेते मानले जातात. त्यांनी २०२२ यावर्षी झालेली विधानसभा निवडणूक त्या जिल्ह्यातील दुसऱ्या मतदारसंघातून लढवली. मात्र, कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या पदरी अपयश आले. नंतर त्यांनी पंजाबची सत्ता काबीज करणाऱ्या आपमध्ये प्रवेश केला. आता ते स्वगृही परतले आहेत. करवाल यांच्या कॉंग्रेस प्रवेशावेळी उपस्थित असणारे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी आपवर टीकास्त्र सोडले. साधारणपणे पोटनिवडणुकांवेळी विरोधी पक्षांमधील नेते सत्ताधारी गोटात जातात. मात्र, पंजाबमध्ये त्याउलट घडत आहे. आपचे सत्तेबाहेर जाणे आणि कॉंग्रेसचे सत्तेत कमबॅक होणे निश्चित आहे. आपला लागलेल्या गळतीतून ते स्पष्ट होत आहे, असे ते म्हणाले.