अविश्वास ठराव आणून दाखवाच

भोपाळ : जर भारतीय जनता पक्षाला बहुमत सिध्द करून हवे असेल तर त्यांनी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करावा, असे आव्हान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले.
बहुमताची चाचणी विश्वासदर्शक ठराव अथवा अविश्वास ठराव अशा दोनच प्रकारात होत आसते. आम्ही सरकार चालवत आहोत. आम्ही आमचे बहुमत गेल्या 15 महिन्यात अनेकदा सिध्द केले आहे. आमच्याकडे बहुमत नाही असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा, असे ते म्हणाले.
अविश्वास ठराव आणायला ते घाबरत का आहेत. ते कॉंग्रेसचे 16 आमदार आणायला घाबरत का आहेत, असे सवाल त्यांनी केले. बंगळुरूमध्ये कॉंग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांना झालेली अटक दुर्देवी आहे, जर गरज पडली तर मी बंगळुरूला जाईन, असेही कमलनाथ यांनी सांगितले.
दरम्यान, सिंह, कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार, मध्यप्रदेशचे कॉंग्रेस नेते सज्जन कुमार हे बुधवारी पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. सिंह हे बंगळुरूमध्ये पहाटे आले. मात्र हॉटेल रामदामध्ये कॉंग्रेसच्या आमदारांना भेटण्यास सिंह गेले असता त्यांना रोखण्यात आले. त्यामुळे त्यांनी तेथेच बसकण मारत आंदोलन सुरू केले. त्यामुळे त्यांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. या घडामोडी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे घडत आहेत. तेथे सत्तांतर घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. शिमदे भाजपात गेल्यानंतर पक्षाच्या 22 आमदारांनी पक्षाचा आणि आमदारपदाचा राजिनामा दिला आहे.

