Kalyan News : दुर्दैवी ! कल्याणमधील खड्ड्यामुळे शिवसैनिकाच्या मुलाचा मृत्यू

कल्याण: कल्याणमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शीळ रोडवरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात शिवसैनिकाच्या एकुलत्या एक मुलाचा, रोहन शिंगरे (वय 28) याचा मृत्यू झाला. या घटनेने शिंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रामबाग येथे राहणारा रोहन शिंगरे वाशीला कामानिमित्त जात होता. 23 जुलै रोजी गॅलेक्सी फर्निचर ते पिंपळेश्वर हॉटेल दरम्यान प्रवास करताना त्याची गाडी रस्त्यातील खड्ड्यात आदळली. यामुळे तो खाली कोसळला. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली त्याचा हात आला आणि तो फरफटत गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातानंतर रोहनला तातडीने मानपाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सानपाडा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. 21 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. रोहन हा कल्याण रामबाग येथील ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.





