कल्याण : कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात गोपाळ झा नावाचा व्यक्ती एका तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसले होते. याप्रकरणी गोपाळ झा व रंजीत झा यांना पोलिसांनी अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, आता या प्रकरणाचा दुसरा व्हिडीओ समोर आला असून सदर रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने या प्रकरणात ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. pic.twitter.com/YhwxDw21AV — Viru B (@ViruB1023220) July 23, 2025 नवीन व्हिडीओमध्ये गोकुळ झा, रंजीत झा त्यांची आई आणि सून उभे असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोकुळ झा यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे दिसून आले. यामध्ये गोकुळ झाने तरुणीला पहिले लाथ मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळही केली. यानंतर गोकुळ झाला शांत करत त्याच्या आईने रुग्णालयाच्या बाहेर पाठवले. यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारली. त्यानंतर गोकुळ झा बाहेरुन धावत आला आणि रिसेप्शनिस्ट तरुणीला जबर मारहाण केली. सदर घटनेवर आरोपींची आई म्हणाली की, सदर घटना माझ्या डोळ्यांसमोर घडली. यात रिसेप्शनिस्ट तरुणीनेच माझ्या सुनेला शिवीगाळ केली होती. त्यानंतर तरुणीने माझ्या सूनेच्या कानाखाली मारली. हा सर्वप्रकार गोकुळने पाहिला आणि बाहेरुन धावत येत त्याने तिला लाथ मारली. मात्र त्याने मारहाण करणे योग्य नव्हते, असा स्पष्ट निर्वाळाही आईने दिला आहे. त्याचबरोबर, सदर प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज कट करून दाखवले जात असल्याचा गंभीर आरोपही गोपाळच्या आईने केला आहे.