Kalyan News : लेडी डॉन फिजा इराणीला अटक

कल्याण : कल्याण डीसीपी स्कॉडने आंबिवली येथील इराणी वस्तीमधून इराणी लेडी डॉनला अटक केली. फिजा इराणी असे अटक करण्यात आलेल्या लेडी डॉनचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 1 लाख 16 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. फिजा इराणी विरोधात याआधी देखील अमली पदार्थ तस्करीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सापळा रचून केली अटक
कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे. यादरम्यान कल्याण डीसीपी स्कॉडला खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबिवली परिसरात बेकायदेशीरपणे एम.डी ड्रग्ज विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला.
तेव्हा या ठिकाणी एक महिला स्कूटी घेऊन उभी होती. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तत्काळ तिला हटकले. तिची झडती घेतली असता तिच्याजवळ एक लाख 16 हजार रुपये किमतीचे एम. डी. ड्रग्ज आढळून आले. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. फिजा इराणी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती आंबिवली जवळील कुप्रसिद्ध असलेल्या इराणी वस्तीमध्ये राहते. तिच्या विरोधात खडकपाडा, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.





