आपण पाहतोच की कित्येक पदार्थ अगदी रोजचे लागणारेही चढ्या भावाने विकले जात आहेत. मध्यंतरी सोशल मीडियावरही मास्क कसे जादा दराने विकले जातात ते दाखवले होते. आता सर्वत्रच पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे. आता याला आपण संस्कृती म्हणावे काय? मागे जपानमध्ये अणुभट्टीचा स्फोट झाला व कित्येक लोक त्या शहरातून बाहेर पडायला बघत होते त्यावेळी त्यांचे नातेवाईकही त्यांना घेण्याकरता आपापल्या गाड्या घेऊन गेले होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की कुठेही ट्रॅफिक नियम किंवा सिग्नल तोडला गेला नाही. तसेच वाटेतील सर्व दुकानांतून व विशेषत: हॉटेलातून अशा लोकांकरता पन्नास टक्के सवलत दिली गेली. उगाचच एवढा छोटासा देश जगामध्ये महान म्हणून मिरवला जात नाही. असो, लोकांनी लॉकडाऊनमध्ये घरात राहावे म्हणून रामायण व महाभारत या जुन्या मालिका पुन्हा दूरदर्शनने आणल्या आहेत. एका जमान्यात ज्या वेळी रामायण सुरू झाले होते त्या वेळी रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसे व रस्ते सुनसान असत. आता रस्त्यावर माणसे येऊ नयेत म्हणून त्या मालिका व इतरही अनेक जुन्या मालिका सुरू केल्या आहेत. आता रामायणाने पुन्हा टीआरपी रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सुरुवातीच्या काही भागांमध्ये जास्त जाहिराती नव्हत्या पण जसजसा टीआरपी वाढला तशा अनेक जाहिराती येऊ लागल्या आहेत. ज्यांच्या जाहिराती येताहेत त्या उद्योगांनीसुद्धा या आपत्तीकडे संधी म्हणून पाहिले आहे. दूरदर्शनचीही चंगळ होणार आहे कारण त्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळेल. तसेच जाहिरातदारांनाही जास्तीतजास्त लोकांपर्यंत थेट पोहोचता येणार आहे. बरं आपण पाहिलं असेल की जाहिराती नेमक्या कोणत्या येताहेत, इलेक्ट्रिक उपकरणे, गाड्या, टूर ऑपरेटर्स? अजिबात नाही. कारण अशा गोष्टींची आता कुणाला गरजच नाही. खाद्यपदार्थ, औषधे यांची लोकांना सतत गरज असतेच पण आता जास्त गरज आहे म्हणून त्या जाहिराती जास्त येत आहेत. तसेच आध्यात्मिक वातावरण होत असल्यामुळे वेगवेगळ्या सुगंधी अगरबत्त्या, धूप तसेच सॅनिटायझर, साबण, स्वच्छतेच्या वस्तू यांच्या जास्त जाहिराती येत आहेत. या सर्वांवर कळस म्हणजे जीवन विमा व आरोग्य विमा यांच्या जाहिराती जास्त झळकत आहेत. जीवन विमा का आवश्यक आहे हे जास्तीतजास्त लोकांवर बिंबवले जात आहे. इस्पितळात ऍडमिट झाल्यास बील कसे वाऱ्याच्या वेगाने वाढते ते दाखवले जाते व आरोग्य विमासुद्धा का असावा हे सर्वत्र दाखवले जात आहे. कित्येक खासगी बॅंकांचे रिलेशनशिप मॅनेजर ई-मेलवर तसेच व्हॉट्सऍपवर आपल्या ग्राहकांना आरोग्य विम्यासंबंधी अलीकडे जास्त माहिती देऊ लागले आहेत. एकूणच बाहेरची परिस्थिती बघता लोकही त्यावर विचार करू लागले आहेत. यामुळे विमा व्यवसाय पुन्हा तेजीत येऊ लागले आहेत पर्यायाने विमा कंपन्याही. वाऱ्याची दिशा पाहून त्या त्या कंपन्या या परिस्थितीतही संधी शोधत आहेत.