K.P. Unnikrishnan : माजी केंद्रीय मंत्री के. पी. उन्नीकृष्णन यांचे निधन
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के. पी. उन्नीकृष्णन (K.P. Unnikrishnan) यांचे आज कोझिकोड येथे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.

K.P. Unnikrishnan : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के. पी. उन्नीकृष्णन (K.P. Unnikrishnan) यांचे आज कोझिकोड येथे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. केरळमधील वडकारा लोकसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा (१९७१ ते १९९१) निवडून येण्याचा दुर्मिळ विक्रम त्यांच्या नावावर होता.
३० सप्टेंबर १९३६ रोजी जन्मलेल्या उन्नीकृष्णन यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणूनही छाप पाडली होती. १९६० च्या दशकात त्यांनी समाजवादी पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आणि नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले.
१९७१ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. संसदेतील अभ्यासू वक्ता आणि वडकारा येथील लोकांशी असलेले त्यांचे घनिष्ठ संबंध यामुळे त्यांनी तीन दशके सक्रिय राजकारण गाजवले. त्यांच्या निधनाने केरळच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.




