K. Kavitha Leaves BRS : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाला आता घरघर लागली असून, स्वतः केसीआर यांच्या कन्या आणि विधान परिषदेच्या सदस्या के. कविता यांनी पक्षाविरोधात बंडाचे निशाण फुंकले आहे. “पक्षात माझा वारंवार अपमान करण्यात आला, आता पुरे झाले,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत कविता यांनी ‘तेलंगणा जागृती’ या आपल्या सांस्कृतिक संघटनेचे रूपांतर एका नव्या राजकीय पक्षात करण्याची घोषणा सोमवारी केली. तेलंगणा विधान परिषदेत आपले शेवटचे भाषण करताना के. कविता कमालीच्या भावूक झाल्या होत्या. पक्षातून निलंबन झाल्यानंतर त्यांनी सप्टेंबर महिन्यातच सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सोमवारी सदन सुरू झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मी आज या सभागृहातून एक सामान्य नागरिक म्हणून बाहेर पडत आहे, पण लवकरच एक मोठी राजकीय शक्ती म्हणून पुन्हा विधानसभा गाठेन.” नव्या पक्षाचा अजेंडा: विद्यार्थी आणि बेरोजगारांना न्याय तेलंगणा आंदोलनाच्या काळात सांस्कृतिक चळवळ म्हणून उभा राहिलेला ‘तेलंगणा जागृती’ हा प्लॅटफॉर्म आता निवडणूक रिंगणात उतरणार आहे. “राज्यात एका नव्या राजकीय पर्यायाची गरज आहे. आमचा पक्ष विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि समाजातील सर्व वंचितांच्या हक्कासाठी लढेल,” असे कविता यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांमध्ये हा पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. कुटुंबातील वादावर पहिल्यांदाच भाष्य – के. कविता यांनी आपल्याच वडिलांच्या (केसीआर) जवळच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या वडिलांच्या अवतीभवती असलेल्या काही लोकांनी माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक कट रचला. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न झाला आणि अखेर मला पक्षाबाहेर काढण्यात आले. हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे,” असे त्या म्हणाल्या. काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या ‘मालमत्ता वादाच्या’ आरोपांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ही लढाई मालमत्तेसाठी नसून स्वाभिमानासाठी आहे. २०१४ मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यापासूनच आपल्यावर आणि आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध लादले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकीय समीकरणे बदलणार? के. कविता यांच्या या निर्णयामुळे तेलंगणाच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. एकीकडे सत्ताधारी काँग्रेस बीआरएसमधील या फुटीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे केसीआर यांच्यासाठी हा मोठा कौटुंबिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे.