K. Kasturirangan : इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे निधन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज सकाळी निधन झाले. ते ते 84 वर्षांचे होते. कस्तुरीरंगन यांनी बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. 27 एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव रमण संशोधन संस्थेत (आरआरआय) जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वात चांद्रयान मोहिमेचे नियोजन
कस्तुरीरंगन हे 1994 ते 2003 पर्यंत इस्रोचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयानासारख्या मोठ्या मोहिमांची योजना आखण्यास सुरुवात केली. ते नवीन शिक्षण धोरणाच्या (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्षही होते. कस्तुरीरंगन यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू आणि कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
कस्तुरीरंगन हे 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले होते. कस्तुरीरंगन हे एप्रिल 2004 ते 2009 पर्यंत बेंगळुरूस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते. त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांचे नेतृत्व केले किंवा त्यांचा भाग होते. त्यांनी उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासह विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
कस्तुरीरंगन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक महान व्यक्तिमत्व असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि राष्ट्रासाठी निस्वार्थ योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांनी इस्रोमध्ये खूप मेहनतीने काम केले आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नवीन उंचीवर नेले.
त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. त्यांचे लक्ष नेहमीच नावीन्यपूर्णतेवर राहिले आहे. नवीन शिक्षण धोरण (एनईपी) साठी भारत नेहमीच डॉ. कस्तुरीरंगन यांचे आभारी राहील. ते अनेक तरुण शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक होते. त्यांच्या कुटुंबियांना, विद्यार्थ्यांना, शास्त्रज्ञांना आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत असे नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.





