PM Modi | Dhurandhar : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या सिनेमावरून सध्या चित्रपटसृष्टीत मोठे वादंग निर्माण झाले आहे. मध्य पूर्वेतील (Middle East) अनेक देशांनी या चित्रपटावर बंदी घातल्यामुळे, चित्रपट निर्मात्यांची संघटना असलेल्या ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (IMPPA) आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून ही बंदी उठवण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. प्रमुख देशांमध्ये प्रदर्शनावर मज्जाव : डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र, संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन, कुवेत, कतार, ओमान आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे चित्रपट वितरकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पत्रातील महत्त्वाचे मुद्दे.! IMPPA चे अध्यक्ष अभय सिन्हा यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ही बंदी एकतर्फी आणि अनावश्यक असून, भारतीय निर्मात्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे उल्लंघन असल्याचे पत्रात म्हटले आहे. चित्रपटाला भारतातील ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (CBFC) कडून रीतसर ‘अ’ प्रमाणपत्र मिळाले असून तो कायदेशीररित्या प्रदर्शित झाला आहे. भारत आणि मध्य पूर्वेतील देशांचे व्यापारी व मैत्रीपूर्ण संबंध अतिशय दृढ आहेत. त्यामुळे सरकारने राजनैतिक पातळीवर या देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही बंदी मागे घेण्यास भाग पाडावे, अशी विनंती करण्यात आली आहे. “हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. एका सदस्याच्या मेहनतीवर ही अन्यायकारक बंदी लादण्यात आली आहे. आम्ही सरकारला हात जोडून विनंती करतो की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमच्या सदस्याला न्याय मिळवून द्यावा.” — अभय सिन्हा (अध्यक्ष, IMPPA) आर्थिक फटका आणि नाराजी : चित्रपट वितरकांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, मध्य पूर्वेतील बाजारपेठ ही भारतीय चित्रपटांसाठी खूप मोठी आहे. तिथल्या बंदीमुळे केवळ महसुलाचे नुकसान होत नाही, तर जागतिक स्तरावर चित्रपटाच्या प्रतिमेवरही परिणाम होतो. ‘धुरंधर’ हा चित्रपट त्याच्या संवेदनशील विषयामुळे चर्चेत असून, आता केंद्र सरकार यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.