Junnar News – जुन्नर तालुक्यातील आणे आणि पेमदरा परिसरात रविवारी (दि. २९) दुपारी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास झालेल्या जोरदार गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. आणे पठार हे वटाण्याचे हब म्हणून ओळखले जाते, मात्र ऐन बहरात आलेल्या आणि तोडणी सुरू असलेल्या वाटाणा पिकाला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे जनावरांचा चारा असलेली मका अनेक ठिकाणी भुईसपाट झाली असून कांद्याचेही नुकसान झाले आहे. आणे पठारावर शेकडो एकर क्षेत्रावर वाटाण्याची पेरणी केली जाते. सध्या अनेक ठिकाणी वाटाणा टोडणीला आलेला असतानाच अचानक झालेल्या गारपिटीमुळे कोवळ्या शेंगांना मार लागला आहे. यामुळे वाटाणा बाधित झाला असून, उत्पादनात मोठी घट होणार आहे. मका आडवी झाल्याने ती सडून जाणार आहे, यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे पठार भागातील शेतकरी हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पेमदरा गावचे माजी सरपंच आनंदा बेलकर यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. कृषी आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाची त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शेत कामांचे नियोजन कोलमडले असून, या अवकाळी पावसामुळे आणे पठारावरील आर्थिक गणिते बिघडली आहेत. आता प्रशासकीय पातळीवर किती वेगाने हालचाली होतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.