Junnar News – जुन्नर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांची मुदत संपल्याने आता शेतकऱ्यांना पूर्णपणे खासगी बाजारावर अवलंबून राहावे लागत आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ च्या हंगामासाठी सोयाबीनला प्रतिक्विंटल ५,३२९ रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र, खरेदी प्रक्रियेतील किचकट अटी, नोंदणीतील तांत्रिक अडचणी आणि मर्यादित कालावधीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला माल शासकीय केंद्रावर विकता आला नाही. आता ही केंद्रे बंद झाल्याने व्यापाऱ्यांच्या मनमानी दराचा सामना करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. यंदा भाव वाढतील या अपेक्षेने अनेक उत्पादकांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. मात्र, जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि आयात-निर्यात धोरणांचा परिणाम स्थानिक दरांवर होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात खासगी बाजारात सोयाबीनचे दर प्रति किलो ५८ रुपयांपर्यंत पोहोचले होते, परंतु काही आंतरराष्ट्रीय करारांच्या चर्चेनंतर हे दर पुन्हा ५० ते ५५ रुपयांच्या दरम्यान खाली आले. सध्या बाजारात ५५ ते ५६ रुपये दर मिळत असून, तो हमीभावापेक्षा जास्त असला तरी शेतकऱ्यांच्या ६५ ते ७० रुपयांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, मजुरी, खते आणि बियाणांचे दर वाढल्याने सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी सोयाबीन हे हमखास नफा देणारे पीक मानले जात असे, मात्र आता उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. आगामी काळात तेलाच्या किमती वाढल्यास सोयाबीनला ६० ते ६५ रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो, अशी अंधुक आशा शेतकऱ्यांना आहे. तरीही, हमीभाव केंद्रांचे कवच गेल्याने छोट्या शेतकऱ्यांना गरजेपोटी मिळेल त्या भावात माल विकावा लागत आहे. “फेब्रुवारीमध्ये खासगी बाजारात दर ५८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र अमेरिकेसोबत झालेल्या शून्य कर सवलतीच्या करारानंतर बाजारभाव अचानक ५० रुपयांपर्यंत घसरले. यंदा ६५ ते ७० रुपये दर मिळेल अशी अपेक्षा होती; पण बाजार अजूनही ५५ रुपयांच्या आसपास अस्थिर आहे. उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे.” – शिवाजी डुंबरे, सोयाबीन उत्पादक शेतकरी “केंद्र शासनाच्या नियमांनुसार तालुक्यातील सर्व हमीभाव खरेदी केंद्रे सध्या बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खुल्या बाजारातच व्यवहार करावे लागत आहेत. शासकीय स्तरावर पुढील आदेश येईपर्यंत ही केंद्रे बंदच राहतील.” – रूपेश कवडे, सचिव, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती