Junnar News – जुन्नर तालुक्यातील आणे पठार परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी टंचाईग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून लवकरच अतिरिक्त टँकर सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पंचायत समितीच्या सभापती कमल शेळकंदे आणि उपसभापती अमित ढोले यांनी आणे, नळवणे, पेमदरा यांसह विविध गावांना भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, अपुरा पुरवठा आणि टँकरच्या अनियमित फेर्यांबाबत संताप व्यक्त केला. आणे गावाच्या सरपंच प्रियंका दाते यांनी सांगितले की, गावाला दररोज सुमारे 1 लाख 60 हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र सध्या टँकर व इतर माध्यमांतून केवळ 60 हजार लिटर पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली असून वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासकीय टँकरना डीझेलच्या तांत्रिक अडचणींमुळे वेळेवर फेर्या करता येत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर सभापती कमल शेळकंदे यांनी तातडीने दखल घेत जनतेला तहानलेले ठेवता येणार नाही. लवकरच अतिरिक्त खासगी टँकर सुरू करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. आणे पठार परिसरात केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. चारा टंचाई.(संग्रहित छायाचित्र) नळवणे, गुळंचवाडी आणि गुंजाळवाडी परिसरात जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. कोणताही भाग पाण्यावाचून वंचित राहणार नाही. जनावरांसाठी स्वतंत्र नियोजन केले जाईल, अशी ग्वाही उपसभापती अमित ढोले यांनी दिली. चार्याअभावी जनावरे विकण्याची वेळ दुष्काळी परिस्थितीमुळे चार्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे सांभाळणे शेतकर्यांना परवडेनासे झाले असून अनेकांनी दूध देणार्या गायी-म्हशी बाजारात विक्रीस काढल्या आहेत. परिणामी जनावरांचे बाजारभाव 15 ते 20 टक्क्यांनी घसरले असून शेतकरी कवडीमोल दरात जनावरे विकत असल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प आणे पठार परिसरात 100हून अधिक पोल्ट्री फार्म असून पाण्याच्या भीषण टंचाईमुळे सुमारे 80 टक्के पोल्ट्री व्यवसाय बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अनेक पूरक व्यवसाय संकटात सापडले असून शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.