ओझर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर जुन्नर दुर्गोत्सवाच्या चौथ्या पर्वाला रविवार, ४ जानेवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटनाच्या पहिल्याच रविवारी ३०० हून अधिक दुर्गप्रेमींनी सहभाग नोंदवला. हे सहभागी पुणे, मुंबई, अहिल्यानगर, नाशिक, संगमनेर, सातारा, कोल्हापूर, सांगली व श्रीगोंदा येथून आले होते. सहभागींची सुरक्षितता आणि दुर्गवाचन सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे यासाठी पुढील ६ रविवारी गट तीन भागांत विभागून तीन वेगवेगळ्या किल्ल्यांवर कार्यक्रम राबवण्याचा आयोजकांचा निर्णय आहे. हा सात आठवड्यांचा उपक्रम दर रविवारी जुन्नर तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला असा एकूण ७ किल्ल्यांवर संपूर्ण दुर्गवाचन करून राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम गजांतलक्ष्मी फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जुन्नर टुरिझम हेल्पडेस्क यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून शिवाजी ट्रेल, तालिश रिसॉर्ट, परफेक्ट कृषी मार्केट यार्ड आणि सुझलॉन एनर्जी या मान्यवर शीर्ष प्रायोजकांच्या सहकार्यामुळे हा भव्य उपक्रम शक्य झाला आहे. उद्घाटनाच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी भूषण विनायक खोत यांच्या नेतृत्वाखाली प्रमीला भोर, अमर गायकवाड, शुभम कडू, मयूर आहेर, सिद्धेश कवडे, प्रभाकर भालचिम, सुशांत पानसरे, धनंजय देसाई, अक्षय काळे, तेजस कामटकर, कोमल मोरे, यश घाडगे, रितेश पानसरे, तुषार वाणी, दत्तात्रय बोडके, कावेरी कबाडी, आदित्य मंचरकर आणि श्लोक कबाडी यांनी उपस्थिती दर्शवली.