Junnar Crime – शहरातील एका भांडी व्यावसायिकाचे गोडाऊन फोडून तांब्या-पितळीचे १०० हांडे चोरून नेणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तीन महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी ५५ हांडे हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आणखी दोन महिला अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर येथील भांडी व्यापारी आनंद सासवडे यांचे भरवस्तीत असलेले गोडाऊन २१ मार्च रोजी रात्रीच्या वेळी फोडण्यात आले होते. चोरट्यांनी तिथून ९० तांब्याचे हांडे आणि १० पितळी कळशा असा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, ५ महिला चोरीचा माल घेऊन जाताना दिसून आल्या. यावरून पोलिसांनी तपास चक्रावून सारिका बबन मकवाने, अंजली सुरज वाघमारे आणि सुरेखा राजू वालेकर (सर्व रा. पंचलिंग झोपडपट्टी, जुन्नर) यांना कुरण फाटा येथे सापळा रचून ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान या महिलांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून ५५ हांडे जप्त करण्यात आले आहेत. या महिलांना पुढील तपासासाठी जुन्नर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस अंमलदार सागर हिले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, महादेव शेलार, सहायक फौजदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, नंदा कदम आणि सुजाता कदम यांच्या पथकाने केली.