मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रशासनास सूचना
पुणे – करोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या. जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले…
– क्वारंटाइन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकिंग आणि टेस्टिंगही मोठ्या प्रमाणात कराव्यात.
– ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्या
– करोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त
अहवाल वेळेत द्या…
करोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण अधिक आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच करोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब आहे. याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
कामात अजिबात ढिलाई नको…
पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला करोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने आपल्या प्रभागात करोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, या कामांत अजिबात ढिलाई नको. शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन्ही महापालिकेल्या सूचना दिल्या.