Jui Gadkari: जुई गडकरीचे लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलासोबत जोडलं नाव; डीपफेक व्हिडीओ पाहून अभिनेत्री संतापली
Jui Gadkari: जुईनं AIव्हिडीओ करणाऱ्याला दिला इशारा

Jui Gadkari: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने एका बनावट व्हिडिओप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. AI मुळे अनेकदा कलाकारांच्या फोटोचा चुकीचा वापर केला जातो. ज्यामुळे कलाकारांना त्रास सहन करावा लागतो. याचाच फटका आता जुईला देखील बसला आहे.
सोशल मीडियावर जुईचे डीपफेक फोटो वापरून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चुकीची माहिती पसरवणारा व्हिडीओ युट्यूबवर प्रसारित करण्यात आला. या बनावट व्हिडीओमध्ये जुईचा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेतसोबत साखरपुडा झाल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, जुईने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. केवळ लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या फोटोचा चुकीचा वापर करून अशा प्रकारचा कंटेंट तयार करणं चुकीचं असल्याचं तिने म्हटलं आहे.
‘व्हिडिओ डिलीट केला नाही, तर लवकरच कोर्टात भेटूया’
जुईनं व्हिडीओच्या स्क्रिनशॉट तिच्या सोशल मीडियावर शेअर करत व्हिडीओ करणाऱ्याला इशारा दिला. तिनं पोस्टमध्ये लिहिलंय, “डिअर तुम्ही जे कोणीही असाल. आधी स्वतःचं आयुष्य आणि नोकरी सांभाळा. केवळ लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी असे फालतू व्हिडिओ बनवायला तुम्हाला लाजही वाटत नाही का?
तुम्हाला धड AI देखील करता येत नाही. भाषा अशुद्ध, सगळंच अशुद्ध. हा व्हिडिओ आजच्या आज डिलीट केला नाही, तर लवकरच कोर्टात भेटूया.” तिने पोस्टच्या शेवटी एक विनंती आहे कृपया या निरर्थक व्हिडिओला आणि या निरर्थक YouTube चॅनेललाही रिपोर्ट करा.
जुई गडकरीने पोस्ट केल्यानंतर त्या युझरकडून तो व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. जुईनं शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केलं असता तो व्हिडीओ दिसत नाही. दरम्यान, कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोटो एडिट करून किंवा डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून चुकीची माहिती पसरवणं योग्य नसल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हणत जुईला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा:






