Vikas Lawande: वारकरी संप्रदायातील काही व्यक्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी मागितलेली पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला. वाघोली पोलिसांनी गुरुवारी लवांडे यांना अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. लवांडे यांनी संबंधित वक्तव्य कोणत्या हेतूने केले, तसेच त्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले होते का, याचा तपास करावयाचा असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाला सांगितले. मात्र, पोलीस कोठडीसाठी पुरेशी कारणे नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. हेही वाचा – मोठा बातमी! ‘या’ शिक्षकांची जनगणना ड्युटीतून सुट्टी; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश जारी लवांडे यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी अटक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा केला. “प्रथम अटक करण्यात आली आणि त्यानंतर नोटीस बजावण्यात आली,” असे त्यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, २० मे रोजी अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढविण्याच्या मागणीला विरोध करताना पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीचा गुन्हा क्रमांक नमूद केल्याचा मुद्दाही समोर आला. याबाबत पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३२/२०१७ ऐवजी ३३/२०१७ असा चुकीचा उल्लेख केल्याचे अॅड. पवार यांनी निदर्शनास आणून दिले. न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात वाघोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी चुकीचा गुन्हा क्रमांक अनवधानाने नमूद झाल्याची कबुली दिली. लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील काही व्यक्तींना “घुसखोर” संबोधल्याचा आरोप असून, त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ९ मे रोजी संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी लवांडे यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडली होती.