स्टील क्षेत्रातील बादशाह! ‘ही’ भारतीय कंपनी स्टील जगतात अव्वल, टाटा-जिंदालला टाकले मागे

JSW Steel Most Valued Steel Company | JSW स्टील लिमिटेड ही जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी ठरली आहे. कंपनीच्या बाजार भांडवलात प्रचंड वाढ झाल्याने ही जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी बनली आहे. यासोबतच, या क्षेत्रातील सर्वात मोठी नावं असलेल्या आर्सेलर मित्तल आणि न्यूकोर कॉर्प यांना मागे टाकले आहे.
JSW स्टील या भारतीय स्टील निर्मात्याचे बाजार भांडवल आता 30.31 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 11 टक्के, तर मागील आठवड्याभरात 4 टक्के तेजी पाहायला मिळाली.
JSW स्टीलने अमेरिकेच्या Nucor Corp ला मागे टाकत जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनण्याची कामगिरी केली आहे. Nucor Corp चे बाजार भांडवल सध्या 29.92 अब्ज डॉलर आहे. युरोपमधील ArcelorMittal, जपानमधील Nippon Steel Corp आणि चीनमधील Baoshan Iron यांसारख्या मोठ्या स्टील कंपन्यांचे बाजार भांडवल 21 अब्ज ते 27 अब्ज डॉलर दरम्यान आहे.
JSW ग्रुपचे विजयनगर, डोलवी आणि सलेम येथे स्टील प्लांट्स आहेत. याशिवाय, कंपनी अमेरिका आणि इटलीमध्येही व्यापार करते. सध्या कंपनीची स्टील उत्पादन क्षमता 35.7 मिलियन टन (MT) आहे. आर्थिक वर्ष 28 पर्यंत 43.5 मिलियन टन आणि आर्थिक वर्ष 31 पर्यंत 51.5 मिलियन टनपर्यंत उत्पादन वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
JSW स्टीलचे बाजार भांडवल इतर भारतीय कंपन्यांपेक्षा जास्त आहे. टाटा स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) या कंपन्यांना जेएसडब्ल्यू स्टीलने मागे टाकले आहे. टाटा स्टील ही भारतातील दुसरी आणि जगातील पाचवी सर्वाधिक मोठी स्टील कंपनी असून, ज्याचे बाजार भांडवल अंदाजे 23.09 अब्ज डॉलर्स आहे. जिंदाल स्टीलचे बाजार भांडवल 10.81 अब्ज डॉलर्स आहे, तर सरकारी कंपनी SAIL चे बाजार भांडवल 5.5 अब्ज डॉलर्स आहे.

