लक्ष्मीपूजनाचा जल्लोष

सातारा – पावसाने घेतलेली एक्झिट, स्वच्छ हवामान, उत्साह, जल्लोष आणि आनंद अशा वातावरणात सातारकरांनी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजनाचा जल्लोषी थाट दाखवला.पहाटेच्या पहिल्या अभ्यंग स्नानानंतर शाहूनगरीमध्ये फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सराफ कट्ट्यावर सोने खरेदीसाठीही गर्दी झाली होती.
वसुबारस, धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सणांचा उत्सव लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सुरू झाला. सोमवारी पहिले अभ्यंगस्नान करत सातारकरांनी पारंपरिक पद्धतीने दीपोत्सवाच्या जल्लोषाला सुरुवात केली. खास पद्धतीचे उटणे, सुगंधी तेल याच्या मिश्रणामुळे आंघोळीचा साज काही वेगळाच होता. घराघरांमध्ये विद्युत रोषणाई, दिवाळीचा खमंग फराळ, बच्चे कंपनीसाठी नवीन कपडे आणि हातात बोनस असल्यामुळे मुक्त खरेदी अशा जोशपूर्ण वातावरण दिवाळीच्या पहिल्या दिवशी सातारा शहरामध्ये पाहायला मिळाले. महागाईचा चटका असो किंवा करोनाच्या वेदना असो या सगळ्या आठवणी मागे ठेवत सातारकरांनी या चैतन्याच्या उत्सवाचे मुक्तहस्ताने स्वागत केले.
करोना अजूनही हद्दपार झालेला नाही. पण आनंद साजरा करताना कुठेही सीमा ठेवायची नाही हे ठरवूनच नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने आणि जोशपूर्ण असे दिवाळीचे स्वागत केले. घरोघरी खमंग फराळाच्या सुवासासोबत फटाक्यांच्या आतषबाजीने सातारा शहर दणाणले. सव्वाशे डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांना बंदी जरी असली तरी लक्ष्मी बॉम्बसारखे दणकट फटाके अजूनही हद्दपार झालेले नाहीत. परंपरेप्रमाणे शहराचे ग्रामदैवत असणारे ढोल्या गणपती आणि कुरणेश्वर, खिंडीतील गणपतीचे दर्शन घेऊन तेथील दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद लोकांनी लुटला. तसेच एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
झेंडूच्या फुलांना मोठी मागणी
लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आली होती. पिवळी, केसरी रंगाच्या झेंडूला मागणी राहिली. या फुलांना सकाळी भाजी मंडई परिसरात 40 ते 50 रुपये किलोचा दर होता. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा दर 100 रुपयांवर पोहोचला होता. पोवई नाका, राजवाडा, एसटी स्टॅंड परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट, शाहूपुरी, मोळाचा ओढा परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी आणली. त्यामुळे नागरिक पूजनासाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करत होते.





