Gracy Singh: ‘लगान’पासून ‘मुन्ना भाई एमबीबीएस’पर्यंत यशाचा प्रवास; सलग हिट चित्रपटांनंतरही ग्रेसी सिंग का झाली बॉलिवूडपासून दूर?
Gracy Singh 'लगान'नंतर ग्रेसीने सलग काही यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. अजय देवगणसोबतच्या 'गंगाजल' आणि संजय दत्तसोबतच्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Gracy Singh: बॉलिवूड अभिनेत्री ग्रेसी सिंग आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. २० जुलै १९८० रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या ग्रेसीने आपल्या साध्या आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, आमिर खानसोबतच्या ‘लगान’ चित्रपटातील ‘गौरी’ ही भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.
ग्रेसी सिंगने अभिनयाची सुरुवात थेट चित्रपटांमधून केली नव्हती. १९९७ मध्ये तिने ‘अमानत’ या दूरचित्रवाणी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९९९ मध्ये ‘हु तू तू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. मात्र, या चित्रपटातून तिला अपेक्षित यश मिळाले नाही.
२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ या चित्रपटाने ग्रेसीच्या आयुष्याला मोठे वळण दिले. या चित्रपटात तिने साकारलेली गौरी प्रेक्षकांना खूप आवडली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवलेच, शिवाय ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या विभागासाठीही नामांकन मिळाले. या यशामुळे ग्रेसी सिंग रातोरात स्टार बनली आणि तिच्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
Gracy Singh
‘लगान’नंतर ग्रेसीने सलग काही यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. अजय देवगणसोबतच्या ‘गंगाजल’ आणि संजय दत्तसोबतच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केले. याशिवाय ती ‘मुस्कान’ या चित्रपटातही झळकली.
मात्र, सुरुवातीच्या मोठ्या यशानंतर तिच्या कारकिर्दीचा वेग हळूहळू कमी झाला. मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये तिची निवड कमी होत गेली. परिणामी, ग्रेसी हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आणि तिची उपस्थितीही कमी झाली.
ग्रेसी सिंगबाबत एक गोष्ट अनेकांना माहीत नाही. ती स्वभावाने अतिशय शांत आणि मितभाषी आहे. ‘लगान’मध्ये गावातील साध्या आणि लाजाळू मुलीची भूमिका साकारल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्यातही ती फार कमी बोलू लागली. तिच्या या स्वभावाचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावला. लोकांमध्ये फार न मिसळणे आणि कमी संवाद साधणे यामुळे तिला काही जणांनी ‘घमंडी अभिनेत्री’ असेही संबोधले. मात्र, तिच्या जवळच्या लोकांच्या मते ती स्वभावाने नम्र आणि साधी आहे.
आज ग्रेसी सिंग चित्रपटसृष्टीपासून बऱ्याच अंशी दूर आहे आणि अतिशय खाजगी आयुष्य जगत आहे. तरीही ‘लगान’, ‘गंगाजल’ आणि ‘मुन्ना भाई एमबीबीएस’मधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अभिनयातील साधेपणा, निरागस चेहरा आणि प्रभावी सादरीकरण यामुळे ग्रेसी सिंगने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप सोडली. तिच्या कारकिर्दीचा प्रवास कमी काळाचा असला, तरी तिने केलेल्या भूमिका आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील संस्मरणीय भूमिकांमध्ये गणल्या जातात.





