बलिया – एका हिंदी वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पत्रकाराची उत्तरप्रदेशात हत्या करण्यात आली असून या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्या पत्रकाराची हत्या केल्याच्या आरोपावरून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
रतन सिंह असे हत्या झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. त्यांच्या वडिलांनी पोलिसांना या संशयित मारेकऱ्यांची नावे कथन केली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत यातील आरोपींवर त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदतही जाहीर केली आहे.
काल सोमवारी रात्री फेफाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पत्रकाराची हत्या झाली. या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला सरकारने त्वरित निलंबित केले. बलियातील श्रमिक पत्रकारांच्या संघटनेनेही या हत्येचा निषेध केला असून सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी आणि त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी केली आहे.