Josh Hazlewood statement on Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने तब्बल १५२ दिवसांनंतर आयपीएल २०२६ च्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या भेदक माऱ्याने आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर हेझलवूडने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर जोश हेझलवूड दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर होता. हॅमस्ट्रिंग आणि त्यानंतर घोट्याच्या (Achilles) दुखापतीमुळे तो १५० पेक्षा जास्त दिवस मैदानाबाहेर होता. मात्र, आरसीबीच्या ताफ्यात परतल्यानंतर त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर लखनऊच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्याने ४ षटकांत केवळ २० धावा देत निकोलस पूरनसारख्या स्फोटक फलंदाजाला तंबूत धाडले. या कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतःची तुलना बुमराहशी का केली? सामन्यानंतर ‘जिओस्टार’शी संवाद साधताना हेझलवूडने आपल्या मर्यादा स्पष्टपणे मान्य केल्या. तो म्हणाला, “माझ्याकडे जसप्रीत बुमराह किंवा इतर गोलंदाजांसारखे ‘स्लोअर बॉल्स’ टाकण्याचे कौशल्य नाही. त्यामुळे मला माझ्या मूळ योजनेवर ठाम राहावे लागते. मी सरावादरम्यान नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मैदानात साधेपणा (Simplicity) आणि अचूक टप्पा हीच माझी ताकद आहे.” हेही वाचा – Atharva Ankolekar Injury : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! सलग तीन पराभवानंतर अष्टपैलू खेळाडू आयपीएलमधून पडला बाहेर भुवनेश्वर कुमारचे केले कौतुक – जोश हेझलवूडने आपल्या गोलंदाजीतील यशाचे श्रेय जोडीदार भुवनेश्वर कुमार यालाही दिले. तो म्हणाला, “भुवनेश्वरने सुरुवातीला परिस्थिती समजून घेतली आणि क्षेत्ररक्षणात योग्य बदल केले. आमची गोलंदाजी युनिट म्हणून भुवनेश्वरने टाकलेले पहिले षटक हीच आमची ताकद ठरत आहे.” गेल्या हंगामात १२ सामन्यांत २२ बळी घेत आरसीबीला चॅम्पियन बनवणाऱ्या हेझलवूडने आतापर्यंत ४१ आयपीएल सामन्यांत ६० बळी पूर्ण केले आहेत.