Johnny Lever Birthday:”हास्यसम्राट जॉनी लीव्हरचा पेन विक्रेत्यापासून करोडपतीपर्यंतचा प्रवास”

Johnny Lever Birthday: देशातील आघाडीचे विनोदी अभिनेते जॉनी लीव्हर आज (१४ ऑगस्ट) आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील एका गरीब ख्रिश्चन कुटुंबात जॉन प्रकाश राव जानुमाला यांचा जन्म झाला. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी सातवीपर्यंतच शिक्षण घेतले आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहानसहान कामे सुरू केली.
लहान वयातच त्यांनी रस्त्यावर पेन विकताना मिमिक्री सुरू केली. नंतर हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये नोकरी करताना ते सहकाऱ्यांसमोर चित्रपटातील कलाकारांची नक्कल करत. याच काळात सहकाऱ्यांनी त्यांना ‘जॉनी लीव्हर’ हे नाव दिलं, जे त्यांच्या ओळखीचं प्रतिक बनलं.
जॉनी लीव्हर हे भारतातील पहिले स्टँड-अप कॉमेडियन मानले जातात. स्टेज शोदरम्यान अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांची कला ओळखली आणि दर्द का रिश्ता चित्रपटात संधी दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
१९९२ ते २००० या काळात सलग आठ वर्षे त्यांचे तब्बल १२० चित्रपट रिलीज झाले, म्हणजे महिन्याला एकाहून अधिक चित्रपट. खिलाडी, बाजीगर, करण अर्जुन, जित आणि जुदाई यांसारख्या हिट चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
सध्या जॉनी लीव्हर यांची एकूण संपत्ती सुमारे २२४ कोटी रुपये आहे. त्यांची कमाई मुख्यतः चित्रपट आणि जगभरातील लाइव्ह शोजमधून होते. ते वर्षाकाठी जवळपास १२ कोटी रुपये कमावतात. याशिवाय त्यांनी रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. मुंबईत ३ बीएचके फ्लॅट, आलिशान व्हिला आणि इतर मालमत्ता तसेच जवळपास एक कोटी रुपयांची Audi Q7 कार त्यांच्याकडे आहे.
आजही ते चित्रपटसृष्टीत सक्रिय असून लवकरच वेलकम टू द जंगल आणि लंतरानी या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. २०२३ मध्येही त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.





