इंद्रायणीनगर – महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते लांडेवाडी चौकापर्यंत सहा मीटर रुंद व एक हजार दोनशे मीटर लांबीच्या जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू आहे. या जॉगिंग ट्रॅकमुळे नागरिकांची चांगली सोय होणार आहे. या ट्रॅकमुळे महामार्गही स्वच्छ राखण्यास मदत होणार आहे. याशिवाय सकाळी व संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाणाऱ्या नागरिकांना पादचारी मार्ग सुरक्षित राहणार असला तरी ट्रॅक बनविताना अतिक्रमण आणि सांडपाण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एवढा खर्च करून देखील जॉगिंग ट्रॅक समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांद्वारे बांधकामातील राडारोडा, विक्रेत्यांद्वारे टाकाऊ माल काही कंपन्यांद्वारे रसायनमिश्रीत धोकादायक टाकाऊ पदार्थ टाकले जातात. काही अज्ञात व्यक्तींद्वारे तर टॅक्टरमधून कचरा आणून रस्त्याच्या कडेला टाकण्याचे प्रकार होतात. या प्रकारांना अटकाव करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला चर खोदण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गाचे विद्रूपीकरण थांबणार आहे. जॉगिंग ट्रॅक उभारल्यानंतर या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुरू झाल्यास रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर आळा बसणार आहे. हा जॉगिंग ट्रॅक नैसर्गिक पद्धतीने उभारण्यात येत असला तरी ट्रॅकमध्ये येणारे अडथळे दूर करण्याचा महापालिकेला विसर पडला असल्याची वास्तव परिस्थिती आहे. जॉगिंग ट्रॅकमधील अडथळ्यांकडे दुर्लक्ष भोसरी पोलीस ठाण्याजवळ दुर्घटनेतील टेम्पो ट्रॅकच्या बाजूला न काढता त्याच्यावरच माती टाकून तो अर्धा जॉगिंग ट्रॅकमध्ये बुजवला आहे. अंडी उबवणी केंद्राजवळ जॉगिंग ट्रॅकमध्ये येणारे भंगाराचे दुकानाचे अतिक्रमणही काढण्यात आलेले नाही. येथूनच थोडे पुढे गेल्यानंतर सखल भागात सांडपाण्यामुळे ट्रॅकवर चिखल झाला आहे. यामुळे ट्रॅकवरून पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच पावसाळ्यात हा ट्रॅक किती दिवस टिकणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. असा आहे ट्रॅक वॉकिंग ट्रॅक मुरुम, दगड, माती यांचा उपयोग करून तयार करण्यात आला आहे. संपूर्ण नैसगिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने नागरिकांना आपले आरोग्य राखण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. या ट्रॅकची रुंदी सहा मीटर तर लांबी एक हजार दोनशे मीटर असा प्रशस्त आहे. पुना स्कूलजवळील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय भिंतीलगतच्या लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या कडेला दगड, माती टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. यासाठी लाल मातीचा उपयोग करण्यात आला आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून हा जॉगिंग ट्रॅक बनविला आहे. परंतु ट्रॅक बनविताना अडथळा ठरणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच माती दगड यापासून बनविलेला ट्रॅक पावसाळ्यात कितपत टिकतो हे पाहणे गरजे आहे. नाहीतर पुढील पावसाळ्यापर्यंत येथे ट्रॅक होता हे फक्त कागदोपत्रीच दिसेल. – स्थानिक रहिवासी, भोसरी.