ज्यो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी; पक्षातीलच नेत्यांनी केली मागणी

वॉशिंग्टन : अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रकृतीस्वास्थ्यतेबाबत दररोजच उलट सुलट बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीतून त्यांनी माघार घ्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा व्हायला लागली आहे. बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षातील नेत्यांनी पुन्हा ही मागणी लावून धरली आहे. विशेषतः आज बायडेन यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर तर या मागणीला अधिकच जोर चढला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते आणि कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी ऍडम शिफ यांनी जाहीरपणे अध्यक्ष बायडेन यांना निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्यास सांगितले आहे.
अध्यक्षांनी त्यांच्या वयामुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे पुन्हा निवडणूक लढवण्याची मोहीम संपवली तर ते देश आणि डेमोक्रॅटिक पक्षासाठी चांगले होईल, असे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि सिनेटमधील बहुसंख्यांकांचे नेते आणि काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ डेमोक्रॅट चक शूमर यांनी बायडेन यांना सांगितले होते.रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने ज्यो बायडेन यांची निवड केली होती. रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात ट्रम्प यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठी सिनेटर जेडी वान्स यांची निवड केली आहे. वान्स हे मूळ भारतीय असलेल्या उषा वान्स यांचे पती आहेत. त्यामुळे अमेरिकेतील भारतीयांची मते आकर्षित करून घेतली जाऊ शकणार आहेत. जर डेमोक्रॅटिक पक्षाने काही फेरबदल केला नाही, तर नोव्हेबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ट्रम्प आणि वान्स जोडीचा सामना बायडेन आणि कमला हॅरिस यांच्याशी होऊ शकतो. मात्र ही एकतर्फी लढत होण्याची शक्यता लक्षात घेऊन बायडेन यांना माघारीचा सल्ला दिला जातो आहे.





