J&K Polls: ओमर अब्दुल्ला यांच्या राजकीय खेळीची कसोटी; लाल चौक ते वैष्णोदेवीसह 26 विधानसभा जागांवर उद्या मतदान

J&K Polls: जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (दि. 25) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि पीडीपीसह नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या टप्प्यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासह अनेक महत्त्वाच्या उमेदवारांची परीक्षा होणार आहे. बुधवारी होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात जम्मू विभागात 11 तर काश्मीरमधून 15 जागा येतात. जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे कारण या टप्प्यातील अपक्ष उमेदवारांची संख्याही शंभरच्या जवळपास आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये यंदा 90 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुक होत आहेत. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला 24 जागांवर मतदान झाले. उद्या दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला 26 जागांवर तर तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला 40 जागांवर मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात लाल चौक ते माता वैष्णो देवी आणि राजौरी, पूंछ ते हजरतबल आणि गंदरबल या महत्त्वाच्या विधानसभा जागांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या 26 जागांवर होणाऱ्या मतदानात 239 उमेदवार राजकीय क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात नॅशनल कॉन्फरन्स 20 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेस करारानुसार 6 उमेदवारांसह रिंगणात आहे. तर या टप्प्यात भारतीय जनता पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या टप्प्यातील 98 अपक्ष उमेदवार राजकीय रिंगणात आहेत.
बुधवारी होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांनी 10 वर्षांपूर्वी जम्मू विभाग आणि काश्मीर विभागातील जागांवर आपले उमेदवार विजयी केले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काश्मीरमध्ये ज्या 15 जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्यापैकी सात जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या होत्या. तर चार जागांवर पीडीपीचे उमेदवार विजयी झाले. खोऱ्यातील या 15 जागांपैकी काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या. एक जागा भारतीय जनता पक्षाला तर एक जागा इतरांना गेली. तसेच भारतीय जनता पक्षाने जम्मू विभागातील 11 पैकी 8 जागांवर विजय मिळवला होता. तर एक जागा काँग्रेसकडे गेली.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या राजकीय ताकदीची बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये चाचणी होणार आहे. दुसरीकडे, जम्मू विभागात भारतीय जनता पक्षासमोर केवळ आपल्या जागा राखण्याचे नव्हे तर इतर जागा जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. त्यातही अपक्ष उमेदवारांची संख्या शंभरच्या आसपास असल्याने दुसरा टप्पाही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करून बारामुल्लामधून खासदार झालेले अपक्ष उमेदवार इंजिनिअर रशीद यांचा पक्षही राजकीय क्षेत्रात लढत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लक्षात घेऊन ओमर अब्दुल्ला यावेळी गंदरबल आणि बडगाममधून आपले राजकीय नशीब आजमावत आहेत.
जम्मू-काश्मीरच्या इतिहासात सर्वाधिक अपक्ष निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या अपक्षांनी मोठ्या राजकीय पक्षांची राजकीय कहाणी बिघडू नये, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते उमेश तलाशी यांचे म्हणणे आहे की, दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी जोरदार आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे दोन्ही जागांवरून निवडणूक जिंकतील आणि खोऱ्यात त्यांचेच सरकार स्थापन होईल, असा त्यांचा दावा आहे. काँग्रेस पक्षाचे नेते सय्यद अबरार अहमद म्हणतात की त्यांचा पक्ष जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांच्या आघाडीसह सर्वत्र चांगल्या निवडणुका लढत आहे. अबरार अहमद यांचा दावा आहे की, यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये त्यांचे सरकार स्थापन होणार आहे.
दरम्यान, 2014 मध्ये जम्मूमधील 11 पैकी 8 जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्या होत्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह काँग्रेसनेही या जागांवर जोरदार राजकीय फिल्डिंग लावली आहे. तर काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबतच पीडीपी आणि बारामुल्लाचे खासदार इंजिनियर रशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्षही राजकीय क्षेत्रात नशीब आजमावत आहे.





