मुंबई – एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहचले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? किंवा भेटीचे कारण काय होते? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री आणि खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे. मात्र, अद्याप भाजपाकडून या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे हे अचानक आपल्या मूळ गावी गेल्याने महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जाण्याआधी जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान, याआधी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा होताना दिसत आहे.