जितेंद्र आव्हाडांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो शेअर करत केले खोचक ट्वीट

मुंबई : मागील काही दिवसांपासून महापुरूषांवरील वक्तव्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंजेबजी असा केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो ट्वीट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली असे ट्वीट केले आहे.त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो प्रदर्शित केला आहे. या फोटोमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिसत आहेत. याच फोटोचा आधार घेत आव्हाड यांनी ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ असे खोचक ट्वीट केले आहे.
औरंगजेबजी च्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळे जी @cbawankule pic.twitter.com/36e0dcg5jR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 4, 2023
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना बावनकुळे यांनी औरंगजेबाचा औरंगजेबजी असा उल्लेख केला होता. “जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे… त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत,” असे हिंदीमधून बोलताना बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केला होता.
बावनकुळे यांच्या त्या वाक्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते. “क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘ जी ‘ म्हणू शकत नाही. औरंग्या तो पापी औरंग्याच!. क्रूरकर्म्या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना, पत्रकाराने हिंदीतून प्रश्न विचारला. या प्रश्नाला हिंदीतून उत्तर देत असताना मी ‘जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबजी ला क्रूर मानत नाहीत‘असे उपरोधाने म्हटले,” असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले होते.





