हॉंगकॉंग : हॉंगकॉंगमधील माध्यम व्यवसायिक आणि लोकशाहीवादी चळवळीचे पुरस्कर्ते जिमी लाय यांना हॉंगकॉंगमधील न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षेच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचे ३ आरोप ठेवण्यात आले होते. या तिन्ही आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. जिमी लाय यांना दोषी ठरवण्यात आल्याचा हॉंगकॉंगमधील मानवी हक्क विषयक संघटनांनी निषेध केला आहे. अभियव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा हा निर्णय असल्याची टीका मानवाधिकारवादी संघटनांनी देखील केली आहे. लाय हाँगकाँग किंवा चीनविरुद्ध कारवाई करण्यासाठी परदेशी देशांना आवाहन करण्याच्या दोन कटांमागील सूत्रधार होते आणि त्यांच्यावर सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करणारे साहित्य प्रकाशित केल्याचा आरोप सरकारने ठेवला होता. जिमी लाय यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि आपण दोषी नसल्याचे न्यायालयात सांगितले होते. या गुन्ह्यात दोषी ठरवले गेल्यामुळे ७८ वर्षीय लाय यांना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. सोमवारच्या शिक्षेविरुद्ध ते वरिष्ठ न्ययालायात अपील करू शकतात. लाय यांच्या मनात अनेक वर्षांपासून चीनबद्दल राग होता आणि ते चीनविरोधात असंतोष निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते, यात काही शंका नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. लाय सातत्याने हॉंगकॉंगबाबत अमेरिकेला हस्तक्षेप करण्याची अपेक्षा करत होते. हा हॉंगकॉंगच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक कायद्याचा भंग असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. आज लाय यांच्यावरील खटल्याचा अंतिम निकाल जाहीर होणार असल्याने न्यायालयाच्या आवारात लाय यांच्या समर्थकांसह लोकशाहीवादी गटांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अमेरिकेसह युरोपीय संघ आणि फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी, तसेच कार्डिनल जोसेफ झेन आणि माजी आमदार एमिली लाऊ यांच्यासह हाँगकाँगच्या लोकशाही समर्थक गटातील अनुभवी व्यक्तीही उपस्थित होत्या. २०२० पासून तुरुंगात.. जिमी लाय हे आता बंद झालेल्या ऍपल डेली वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. ते २०२० पासून तुरुंगात आहेत. २०१९ मध्ये झालेल्या मोठ्या आणि काहीवेळा हिंसक लोकशाही समर्थक आंदोलनांनंतर चीनने हाँगकाँगवर लादलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत राजकीय स्वातंत्र्याची होत असलेल्या घसरणीचे उदाहरण म्हणून त्यांच्या प्रकरणावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. हॉंगकॉंगमधील लोकशाही चळवळीला पायबंद घालण्यासाठी चीनने कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा केला असून या कायद्याखाली अनेक पत्रकार आणि माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांवर जाचक निर्बंध घातले आहेत. लाय यांनी लोकशाहीवादी चळवळीचे नेतृत्व केले होते.